latest

M80 चं इंजिन, रिक्षाचा गिअरबॉक्स वापरून बनवली Ford 1930

Share

सांगलीमधील दत्तात्रय लोहार यांनी बनवलेली किक स्टार्ट चारचाकी गाजत असतानाच याच शहरातील आणखी एका अवलियाने जुगाड गाडीचा भन्नाट प्रयोग केला आहे. अवघ्या ३० हजार रुपयात भंगारातील साहित्य आणि दुचाकीचा इंजिन असा जुगाड करत १९३० च्या मिनी फोर्ड गाडीचे मॉडेल एका सांगलीकराने बनवले आहे.

आठवीपर्यंतच शिक्षण झालेल्या अशोक आवटी नावाच्या मॅकेनिकल कारागिराने ही भन्नाट जुगाड गाडी बनवली आहे. नुकतेच देवराष्ट्रे येथील फेब्रिकेशन व्यवसायिक असणाऱ्या दत्तात्रय लोहार यांनी जुगाड जिप्सी गाडी बनवली होती, त्याची चर्चा सुरू असताना आता आणखी एक जुगाड गाडी सांगलीत तयार झाली आहे.

सांगली शहरातल्या काकानगर या ठिकाणी राहणाऱ्या अशोक आवटी या मेकॅनिकल कारागिराने आपल्या कल्पक बुद्धीने ही चार चाकी गाडी बनवली आहे. आवटे यांचे ट्रॅक्टर आणि दुचाकी दुरुस्तीचे गॅरेज आहे. २०१९ च्या लॉकडाऊनच्या काळामध्ये युट्युबवर त्यांनी काही व्हिडिओ बघितले आणि आपल्या लहान मुलांना काही तर वेगळी गोष्ट देण्याच्या हिशोबाने एखादी चारचाकी गाडी बनवता येईल या दिशेने प्रयत्न सुरू केला.

तब्बल अडीच वर्षांच्या अथक प्रयत्नानंतर आणि परिश्रमानंतर अशोक यांनी एक भन्नाट चार चाकी गाडी बनवली आहे. ही गाडी अगदी हुबेहूब १९३० सालच्या फोर्डगाडी प्रमाणे तयार केली आहे. विशेष म्हणजे भंगारातील वस्तू आणि दुचाकी व रिक्षाचे साहित्यातून ही गाडी साकारली आहे. या गाडीची इंजन हे एमएटी दुचाकीचे आहे. गाडी सुरू करण्यासाठी रिक्षाप्रमाणे हँडल आहे आणि रिव्हर्स गिअरसाठी या गाडीला रिक्षाचा गिअरबॉक्स बसवला आहे. स्टेरिंग हा छोट्या ट्रॅक्टरचा आहे. तर चाके ही एमएटी दुचाकीची आहेत.तीन गिअर असणारी ही चार चाकी फोर्ड गाडी, प्रति लिटर ३० किलोमीटर इतके मायलेज देते.

चार व्यक्ती या गाडीमध्ये बसू शकतात. आता आवटी यांची ही भन्नाट १३० मॉडेलची अगदी फोर्डच्या खऱ्याखुऱ्या गाडीप्रमाणे दिसणारी हुबेहूब गाडी तयार झाली आहे. आता ती रस्त्यावर धावू लागली असून येणाऱ्या जाणाऱ्यांचे लक्ष ही मिनी फोर्ड गाडी वेधून घेत आहे.