Belagavi

सुरळीत पाणी पुरवठ्यासाठी प्रयत्न; जनतेने सहकार्य द्यावे : आ. बेनके

Share

 नव्या व्हॉल्वमन्सची नेमणूक करून त्यांना प्रशिक्षण देऊन शहराचा पाणी पुरवठा सुरळीत करण्याचा प्रयत्न केला जात आहे. तोवर जनतेने सहकार्य द्यावे असे आवाहन . अनिल बेनके यांनी केले

बेळगावात पाणी पुरवठा मंडळाच्या व्हॉल्वमननी आपल्या मागण्या पूर्ण करण्यासाठी कामावर बहिष्कार टाकला आहे. त्यामुळे शहराचा पाणी पुरवठा विस्कळीत झाला आहे. या पार्श्वभूमीवर आ. अनिल बेनके यांनी शुक्रवारी महापालिका सभागृहात पालिकेचे आणि एल अँड टी कंपनीचे अधिकारी व नगरसेवकांची बैठक घेतली. यावेळी शहराचा पाणी पुरवठा ठप्प झाल्याने नगरसेवकांनी जोरदार तक्रार केली. त्यावर आ. बेनके यांनी पाणी पुरवठ्यात कोणताही व्यत्यय येणार नाही याची दक्षता घेण्याची सूचना अधिकाऱ्यांना दिली.

यासंदर्भात बोलताना आ. बेनके म्हणाले, शहराच्या उत्तर भागात पाण्याचाही समस्या निर्माण झाली आहे. त्यामुळे पालिका, एल अँड टी अधिकारी आणि नगरसेवकांची बैठक घेतली आहे. व्हॉल्व्हमन्सनी कामावर बहिष्कार टाकून आंदोलन सुरु केले आहे. त्यामुळे निवृत्त व्हॉल्व्हमन्सना घेऊन पुरवठा सुरु ठेवला आहे. तसेच नवीन व्हॉल्व्हमन्स भरती करून घेण्यात  येत आहे.

त्यानंतर पाणी पुरवठा मंडळाचे अधीक्षक अभियंता प्रभाकर म्हणाले, व्हॉल्व्हन्सना सेवेत कायम करण्याचा अधिकार आपल्याला नाही. तो अधिकार सरकारचा आहे. कोरोना असल्याने आंदोलन करू नका असे सांगूनही कर्मचारी आंदोलन करत आहेत. ही बाब जिल्हाधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणली आहे. काही नवे कामगार भरती करून, टँकरने पाणी पुरवून लोकांचा त्रास कमी करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे असे ते म्हणाले.

बैठकीला पालिका आयुक्त डॉ. रुद्रेश घाळी, एल अँड टी कंपनीचे व्यवस्थापक हार्दिक देसाई आदी उपस्थित होते.