Crime

मुस्लिम महिलांची बदनामी प्रकरण; बेंगळुरातील युवकाला मुंबई पोलिसांकडून अटक

Share

बुली बाई या ऍपवरुन मुस्लिम महिलांची बदनामी केली जात असल्याचे उघड झाले होते. या प्रकरणी मुंबई पोलिसांच्या सायबर सेलने बेंगळुर येथून एका 21 वर्षीय युवकाला ताब्यात घेतले आहे. तो इंजिनिअरींगचे शिक्षण घेत आहे. सध्या मुंबई पोलिसांनी आरोपीबाबत अधिकची माहिती दिलेली नाही. मात्र मुंबई पोलिसाने त्याला ताब्यात घेतले असून, आरोपीला आता मुंबईत  आणले जात आहे.

दरम्यान, यासंदर्भात दिल्ली पोलिसांनी गिटहब प्लॅटफार्मकडून या ऍप्स डेव्हलपर्स विषयी अधिकची माहिती मागितली आहे. सोबतच ट्विटला याविषयी असलेले आक्षेपार्ह पोस्ट हटवण्याचे देखील दिली पोलिसांनी सांगितले आहे.

एका जणाविरुद्ध गुन्हा दाखल

मुस्लिम महिलांच्या इंटरनेटवर होत असलेल्या बदनामी विरोधात रविवारी दक्षिण मुंबईतील एका पोलिस ठाण्यात आयटी कायदा आणि आयपीसी सेक्शन अंतर्गत अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गिटहब प्लॅटफार्मच्या ‘बुली बाई’ या ऍप्सच्या माध्यमातून महिलांचे फोटो एडिट करुन आक्षेपार्ह टिप्पणी केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सायबर कायद्याच्या कलमान्वये गुन्हा दाखल

मुंबई पोलिसांनी रविवारी दाखल केलेल्या गुन्ह्यात आयपीसी कलम 153- ए ( धार्मिक आधारावर दोन समुदायामध्ये भेदभाव), कलम 153-बी ( जाणूनबुजून धार्मिक भावना दुखावणे), 354-डी ( पाठीमागे लागणे), 509 (महिलांची बदनामी करण्याचा प्रयत्न) आणि कलम 500 (अपराधिक मानहानी) या कलमाखाली मुंबई सायबर सेलने गुन्हा दाखल केला आहे. सोबतच आयटी कलम 67 (इंटरनेटवर आक्षेपार्ह मजकूर प्रसिद्ध करणे) या कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी डेव्हलपर्सची माहिती मागवली

दिल्ली पोलिसांनी सोमवारी डॉजी ऍप्लिकेशनच्या डेव्हलपर्सला गिटहब प्लेटफार्मविषयी अधिकची माहिती मागितली होती. तर ट्विटरला देखील महिलांशी संबंधित आक्षेपार्ह मजकूर हटवण्याचे आदेश पोलिसांनी दिले आहेत. पोलिसांनी ट्विटरवर गिटहबसंबंधी सर्वात अगोदर ज्या व्यक्तीने ट्विट केले होते, त्याविषयी माहिती मागितली आहे.

प्रियंका चतुर्वेदींनी केली होती तक्रार

मुस्लिम महिलांची इंटरनेटवर बदनामी होत असल्याच्या विरोधात सर्वप्रथम शिवसेना खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी आवाज उठवला होता. त्यांनी बुली ऍपवर बंदी घालण्याची मागणी केंद्रीय आयटी मंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे केली होती.

आयटी मंत्र्यांनी ऍपवर घातली बंदी

शिवसेना खासदार प्रियंका चतुर्वेदी यांच्या तक्रारीवरुन केंद्रीय आयटी विभागाने बुली बाई या ऍपला ब्लॉक केले आहे. शनिवारी रात्री प्रियंका चतुर्वेदीनी ट्विट करत ऍपवर आयटी मंत्री अश्विनी वैष्णव यांनी बंदी घातल्याची माहिती दिली होती.