Politics

असे लै पाह्यलेत सोड बाबा ! रमेश यांच्या आव्हानावर शिवकुमारांची प्रतिक्रिया

Share

बेळगावात आम्हाला कोणी प्रतिस्पर्धी नाही, आमच्यात कोण रिबेलही नाही, आणि पक्षाची फसवणूक करणाराही कोणी नाही अशा शब्दांत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष डी. के. शिवकुमार यांनी . रमेश जारकीहोळी याना त्यांचे नाव घेता टोला लगावला.

बेळगावात सोमवारी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना शिवकुमार म्हणाले, काँग्रेसमध्ये एकमत आहे. संपूर्ण पक्ष सांघिकपणे निवडणुकीला सामोरे जात आहे. एका ठिकाणी थोडे मतभेद होते. मात्र निवडणुकीनंतर ते ही दूर होतील आणि आम्ही सगळे एकसंघपणे पक्षासाठी काम करू. हाच आमच्या पक्षाचा पहिला विजय आहे. भाजपचे तसे नाही. एकच व्यासपीठ, एकच लोक, भाषणे मात्र दोन. भाजप एवढा कमकुवत झालाय असे आम्हाला वाटले नव्हते. पक्षश्रेष्ठींना निर्णय घेण्यास त्यांनी मजबूर केले आहे. डिसेंबर १४ नंतर युद्ध होईल या रमेश जारकीहोळी यांच्या विधानाबाबत विचारलेल्या प्रश्नावर, ‘असे खुपजण पहिले आहेत, सोड बाबा !’ अशी प्रतिक्रिया शिवकुमार यांनी दिली.

काय चूक केलीत म्हणून तिहारला जाऊन आलात? असा प्रश्न भाजपनेते ईश्वरप्पा यांनी शिवकुमारांना नुकताच केला होता. त्यावर प्रतिक्रिया देताना शिवकुमार म्हणाले, ‘तुम्ही पाठवले म्हणून मी गेलो, तुम्ही का पाठवले तर तुम्हाला मी सपोर्ट केला नाही, तुमच्यासोबत आलो नाही, म्हणून पाठवले असे ते म्हणाले. तुम्ही भाजपमध्ये गेला नाहीत म्हणून तुम्हाला जेलमध्ये पाठवण्यात आले का या प्रश्नावर, ‘सगळे ठाऊक आहेच ना? रेकॉर्ड आहेच की’ असे उत्तर शिवकुमार यांनी दिले.

‘राज्यात काँग्रेसचा श्वास कोंडून टाकू’ असे विधान माजी मुख्यमंत्री येडियुरप्पा यांनी केले होते. त्याबाबतच्या प्रश्नावर, बिचारे येडियुरप्पा, त्यांना स्वतःचे दुःख भाजपपुढे मांडता येत नाही. त्यांचे दुःख, अवमान, प्राप्तिकरचे छापे, राजीनामा, पक्षातील मानसिक छळ हे सगळे त्यांना स्वतःच्या पक्षापुढे व्यक्त करता येत नाही. आम्ही खुल्या मनाचे आहोत, म्हणून आमच्यासमोर मांडताहेत इतकेच. मांडू देत, आम्हाला कायमस्वरूपी विरोधी बाकावर बसवू देत. त्यांच्या सरकारचे स्थैर्य आम्ही नव्हे तर त्यांच्याच पक्षाचे लोक बिघडवत आहेत. एका राष्ट्रीय पक्षाला एक राज्य ताब्यात ठेवता येत नाही का? असा प्रश्न करून कॅबिनेट मंत्री निराणी मुख्यमंत्री होतील असे त्यांचेच लोक म्हणतात. मग अजून त्यांना मंत्रीच का ठेवले आहे कोणास ठाऊक अशी खिल्ली शिवकुमार यांनी उडवली.

बेळगावात १३ पासून सुरु होणाऱ्या अधिवेशनाला काहींचा विरोध असल्याबाबतच्या प्रश्नावर शिवकुमार म्हणाले, बेळगावात अधिवेशन घ्यावे यासाठी मीच मुख्यमंत्री बोम्मई यांच्यावर दबाव टाकला होता. आता दबावाखाली अधिवेशन घेत आहेत. काही तरी करून ते पुढे ढकलण्याचा प्रयत्न करत आहेत. अधिवेशन पुढे ढकलू नये असे मी सभापतींना सांगितले आहे. जर पुढे ढकलले तर आम्ही मोठ्या प्रमाणात सामूहिक आंदोलन करू असा इशारा शिवकुमार यांनी दिला.  म्हादई प्रकरणी विधिमंडळ बैठकीत चर्चा करणार आहोत असे सांगून शिवकुमार म्हणाले, म्हादई लवादाच्या निर्णय आल्यानंतरही राज्य सरकारला काम सुरु करता आले नाही. राज्यातील २८ खासदार पाहिजेत का गोव्याचा एक खासदार पाहिजे हे त्यांनी ठरवावे. स्वतः मुख्यमंत्री बोम्मई याआधी पाटबंधारे मंत्री होते. ते म्हादईसंदर्भात काही तरी करतील असे वाटले होते. परंतु राजकीयदृष्ट्या तेसुद्धा ‘वीक’ झाले आहेत अशी टीका शिवकुमार यांनी केली.

एकंदर अनेक मुद्यांवर शिवकुमार यांनी भाजप सरकार आणि नेत्यांवर चांगलाच निशाणा साधला.