Banglore

ज्येष्ठ कन्नड अभिनेते शिवरामण्णा यांचे निधन

Share

पॉवर स्टार पुनीत राजकुमार यांच्या निधनानंतर कन्नड चित्रपट सृष्टीतील पुन्हा एका ज्येष्ठ अभिनेत्याचे निधन झाले आहे. ज्येष्ठ अभिनेते शिवरामण्णा यांचे शनिवार दिनांक ४ डिसेंबर रोजी निधन झाले असून कन्नड चित्रपट सृष्टीवर शोककळा पसरली आहे.

गेल्या काही कार अपघातामध्ये जखमी झालेल्या शिवरामण्णा यांच्यावर रुग्णालयात उपचार करण्यात आले होते. यानंतर त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली. यानंतर निवासस्थानी अय्यप्पा स्वामींच्या पूजेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पाय लचकून जमिनीवर पडल्याने शिवरामण्णा यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. विद्यापीठ सर्कल जवळ असलेल्या प्रशांत हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार करण्यात आले परंतु ब्रेन डॅमेजमुळे शिवरामण्णा कोमात गेले. त्यांच्यावर पुढील उपचार सुरु असताना उपचारायचा फायदा न झाल्याने त्यांची प्राणज्योत मालवली. १९३८ साली चुडसन्द्र गावात एस. शिवराम यांचा जन्म झाला असून गेल्या सहा दशकांपासून शेकडो चित्रपटात त्यांनी अभिनय केला. एस. शिवराम असे नाव असूनही शिवरामण्णा या नावाने त्यांच्या चाहत्यांमध्ये ते प्रसिद्ध होते. सहाय्यक अभिनेता, कॉमेडियन, दिग्दर्शक आणि निर्माता म्हणून त्यांनी चित्रपटसृष्टीत मोलाचे योगदान दिले आहे. ‘राशी ब्रदर्स टेलिकम्युनिकेशन’ कंपनीच्या अंतर्गत अनेक चित्रपटांची निर्मिती त्यांनी केली आहे. त्यांच्या निधनानंतर अनेक मान्यवरांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

शिवराम यांनी पुट्टण्णा कनगाल यांच्यासोबतही काम केले होते. शिवराम यांनी अनेक दिग्गज अभिनेत्यांसोबत अभिनय केला. अनेक यशस्वी चित्रपटांमध्ये काम केले. शिवराम यांच्या मुलाने त्यांच्या निधनाची अधिकृत वार्ता दिली असून रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांचे निधन झाल्याचे जाहीर केले. त्यांना वाचवण्यासाठी अनेक प्रयत्न करण्यात आले. परंतु ते यशस्वी ठरले नसल्याचेही त्यांनी सांगितले.

अभिनेता शिवराम यांचे पार्थिव बंगळुरूच्या त्यागराज नगर येथील त्यांच्या निवासस्थानी आणण्यात आले आहे. यावेळी अंतिम दर्शनाची व्यवस्था करण्यात आली. मुख्यमंत्री बसवराज बोम्मई, महसूल मंत्री आर. अशोक, ज्येष्ठ अभिनेते शिवराजकुमार, श्रीनाथ तसेच चित्रपट आणि राजकीय क्षेत्रातील मान्यवरांनी यावेळी उपस्थिती दर्शविली. मुख्यमंत्री बसवराज बोम्मई, माजी मुख्यमंत्री येडियुरप्पा, सिद्धरामय्या, कुमारस्वामी आणि इतर अनेकांनी शिवराम यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. शिवरामण्णा यांचे अंतिम दर्शन घेतल्यानंतर बोलताना अभिनेता शिवराजकुमार म्हणाले की शिवरामण्णा यांना आमच्या कुटुंबाबद्दल खूप प्रेम आणि आदर होता. आमच्या जवळचे लोक आमच्यापासून दूर जात आहेत. त्यांच्या कुटुंबीयांना आणि आप्तेष्ठांना हे दुःख सहन करण्याची शक्ती देव देवो, अशा शब्दात त्यांनी श्रद्धांजली वाहिली.

शिवरामण्णा यांचे अंतिम दर्शन घेतल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी श्रद्धांजली वाहिली. ते म्हणाले की, शिवराम यांचे निधन हे चित्रपटसृष्टीचे कधीही न भरून येणारे नुकसान आहे. शिवराम यांच्या पार्थिवावर पोलीस सन्मानात अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

शिवरामण्णा यांच्यावर उद्या अंत्यसंस्कार करण्यात येणार असून रवींद्र कलाक्षेत्रात अंतिम दर्शनाची व्यवस्था करण्यात येणार आहे. २ तास अंतिम दर्शनासाठी वेळ देण्यात आला असून यानंतर बनशंकरी स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत, अशी माहिती महसूल मंत्री आर अशोक यांनी दिली.

कन्नड चित्रपट सृष्टीत बहुमोल योगदान देणाऱ्या शिवरामांना यांच्या निधनामुळे कन्नड चित्रपट सृष्टीसह चाहत्यांवरही शोककळा पसरली आहे. शिवरामण्णा यांच्या आत्म्याला ईश्वरचरणी शांती लाभो. टीम इन न्यूजच्यावतीने शिवरामण्णा यांना भावपूर्ण श्रद्धांजली.