Belagavi

आमदार लक्ष्मी हेब्बाळकरांचा नवा गौप्य्स्फोट : भाजपमध्ये होणाऱ्या घटनांची माहिती असल्याचा दावा

Share

आपण भाजपच्या संपर्कात असून भाजपमध्ये काय होत आहे हे मला सांगितले जाते, अशा शब्दात एक नवा खुलासा बेळगाव ग्रामीणच्या आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांनी केला आहे.

काँग्रेसला पराभूत करणे हे आपले मुख्य ध्येय असल्याचे विधान माजी मंत्री आणि आमदार रमेश जारकीहोळींनी केले होते. या विधानाला आम. लक्ष्मी हेब्बाळकर यांनी प्रतिक्रिया देताना म्हटले की या विषयावर मी आता अधिक काही बोलणार नाही. रमेश जारकीहोळींच्या विधानाला केपीसीसी कार्याध्यक्ष सतीश जारकीहोळी यांनी आधीच प्रत्त्युत्तर दिले आहे. असे त्या म्हणाल्या.

दिवसेंदिवस आमच्या उमेदवाराला पाठिंबा वाढत असून ही निवडणूक वेगळ्या दिशेने घेऊन जाण्याची माझी इच्छा नसल्याचे हेब्बाळकर म्हणाल्या. काँग्रेसला पराभूत करण्याचे त्यांचे मुख्य ध्येय असेल तर ते असूद्यात. जिल्ह्यात कांग्रेस नेते आणि कार्यकर्ते आहेत. काँग्रेस पक्ष अजून जिवंत आहे. शिवाय भाजपचे अनेकजण माझ्या संपर्कात असून त्या पक्षात काय घडते हे सर्व मला सांगितले जाते, त्या पक्षातील मतदारांनी माझ्या पाठीशी असल्याचे सांगितले असून देवाचा आपल्याला आशीर्वाद असल्याचे त्या म्हणाल्या. (बाईट)

माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि केपीसीसी राज्याध्यक्ष डी के शिवकुमार विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बेळगावमध्ये येणार आहेत. जिल्ह्यातील रामदुर्ग, चिकोडी उपविभाग, रायबाग अशा अनेक ठिकाणी भेट देणार असून जाहीर प्रचारात सहभाग घेणार आहेत. त्याचप्रमाणे केपीसीसी कार्याध्यक्ष सतीश जारकीहोळीदेखील बेळगावमध्ये येणार असून ते कागवाड मध्ये प्रचारासाठी जाणार असल्याचे हेब्बाळकरांनी सांगितले. तसेच मतदार हे जागरूक असून ते योग्य तो निर्णय घेतील, असे लक्ष्मी हेब्बाळकर यांनी सांगितले. (बाईट)

विधान परिषद निवडणूक असो किंवा इतर विषय… जारकीहोळी व्हर्सेस हेब्बाळकर हे समीकरण नेहमीच वादाचा विषय ठरले आहे. राजकीय पटलावरील उभयतांमध्ये नेहमीच शाब्दिक युद्ध सुरु असते. सध्या विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसला हरविणे आपले मुख्य ध्येय असल्याचे विधान करणारे रमेश जारकीहोळी यांच्या विधानाला आमदार हेब्बाळकरांनी अधिक प्राधान्य न देता उलट भाजपच्या गोटात कोणती डाळ शिजत आहे? हे आपल्याला माहित असल्याचा गौप्य्स्फोट करून चर्चेला पुन्हा उधाण आणले आहे.

पॉलिटिकल ब्युरो, इन न्यूज, बेळगाव