Belagavi

हिवाळी अधिवेशनासंदर्भात बेळगावात हॉटेल मालकांची सभा

Share

बेळगावातील सुवर्णसौधमध्ये पुढील महिन्यात होणाऱ्या हिवाळी अधिवेशनासंदर्भात हॉटेल, रिसॉर्ट्स सज्ज ठेवण्याची सूचना अधिवेशनाचे विशेष अधिकारी डॉ. सुरेश इटनाळ यांनी हॉटेल मालकांना केली.

विधिमंडळ हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर बेळगाव महापालिकेच्या सभागृहात गुरुवारी शहर-परिसरातील हॉटेल्स, रिसॉर्ट्स, लॉज मालकांची सभा घेण्यात आली. यावेळी बोलताना अधिवेशनाचे विशेष अधिकारी डॉ. सुरेश इटनाळ यांनी, अधिवेशनासाठी येणाऱ्या लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांच्या राहण्यासाठी सोय करण्यासही सूचना हॉटेल मालकांना केली. १२ ते २४ डिसेंबर या काळात दुसऱ्या कोणासाठीही रूम्स बुक करू नयेत, २०१८च्या अधिवेशनावेळी जो दर आकारला होता तोच दर यावेळीही आकारावा, येणाऱ्या पाहुण्यांना चांगल्या दर्जाची सेवा, नाश्ता व जेवण द्यावे, सॅनिटायझेशन करून स्वच्छता राखावी अशा सूचना केल्या.

यावेळी हॉटेलमालकानी सांगितले की, २०१८ पासून आजवर अनेक वस्तूंची दरवाढ झाली आहे. त्यामुळे आम्हाला दरवाढ वाढवून द्यावेत अशी मागणी केली. त्यानंतर पुढे बोलताना डॉ. सुरेश इटनाळ म्हणाले, कोविडचा धोका अद्याप पूर्णपणे टळलेला नाही. तरीही तुम्हाला पूर्ण क्षमतेने व्यवसाय करण्याची मुभा दिली आहे. त्यामुळे सर्वानी सहकार्य करावे. २ डिसेम्बरला सभापती बेळगावात येणार आहेत. त्यांच्यासमोर तुमच्या मागण्या मांडून चर्चा करू असे सांगितले.

यावेळी महानगर पालिका आयुक्त डॉ. रुद्रेश घाळी, निवास व्यवस्थेचे प्रभारी डॉ. शशिधर नाडगौडा, पालिका आरोग्याधिकारी डॉ. संजय डुमगोळ यांच्यासह सांख्यिकी खात्याचे व पालिकेचे अधिकारी, हॉटेल मालक उपस्थित होते.