Vijayapura

ढगाळ वातावरणामुळे द्राक्ष उत्पादक चिंतेत

Share

गेल्या पाच दिवसापासून असलेल्या ढगाळ वातावरणामुळे द्राक्ष उत्पादक चिंताग्रस्त झाले आहेत. रात्रभर रिमझिम पाऊस, सकाळी धुके, आणि दिवसभर ढगाळ वातावरण अशा निसर्गाच्या विचित्र चक्रामुळे द्राक्ष बागायतीवर संकट आले आहे. वर्षभर करण्यात येणाऱ्या कष्टावर पाणी पडणार या भीतीने शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत.

गेल्या पाच-सहा दिवसांपासून असलेल्या ढगाळ वातावरणाचा फटका द्राक्ष उत्पादकांना बसत आहे. विजापूरमध्ये मोठ्या प्रमाणात द्राक्षांचे उत्पादन घेतले जाते. यंदा पाऊस कमी झाल्यामुळे हवामानातील होत असलेल्या फरकाचा द्राक्ष पिकावर परिणाम झाला. लाखो रुपये खर्चून घेण्यात येत असलेल्या द्राक्ष वेली पिवळ्या पडत असून वारंवार होणारे हवामानातील बदल यासाठी कारणीभूत आहेत. पहाटे धुके, दिवसभर ढगाळ वातावरण आणि रात्री पडणारा रिमझिम पाऊस यामुळे द्राक्षाचे घड काळे पडत चालले आहेत. अशातच द्राक्ष वेलींवर विविध प्रकारच्या रोगांचा प्रादुर्भाव झाला असून कितीही औषधांची फवारणी केली तरी याचा कोणताही फायदा होत नसल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.

विजापूर जिल्ह्यात १७ हजार हेक्टरहून अधिक प्रदेशात द्राक्ष उत्पादन घेतले जाते. विजापूर, तिकोटा, बबलेश्वर, निडोणी या भागात सर्वाधिक द्राक्षाचे पीक घेतले जात असून, जिल्हाभरात द्राक्ष पिकावर विविध रोगांचा प्रादुर्भाव होत आहे. साधारणपणे ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात द्राक्ष काढणी आणि इतर प्रक्रियांना प्रारंभ होतो. मात्र यंदाच्या ढगाळ वातावरणामुळे या प्रक्रियेचे संपूर्ण रूप पालटले आहे. वातावरणात होत असलेल्या बदलांचा द्राक्षवेलीवर विपरीत परिणाम होत असून यंदा द्राक्षांचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घटणार आहे. द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांचे यामुळे लाखो रुपयांचे नुकसान होणार असून यासाठी सरकारने शेतकऱ्यांना आर्थिक सहकार्य करण्याची मागणी द्राक्ष उत्पादक करत आहेत.

केवळ एका आठवड्यात पालटलेल्या हवामानाचा द्राक्ष उत्पादकांना फटका बसला असून बाजारपेठेत यंदा द्राक्षांची आवक कमी होण्याची शक्यता जाणवत आहे. अशाच पद्धतीने वातावरण राहिल्यास बाजारपेठेत दाखल होणाऱ्या द्राक्षांची आवक मंदावून द्राक्षांच्या दरात मात्र कमालीची वाढ होण्याचीही शक्यता आहे.