Belagavi

अवकाळी पावसाचा शेतकऱ्यांना फटका : मका आणि कापसाच्या पिकाचे नुकसान

Share

राज्यासह बेळगाव जिल्ह्यातही अवकाळी पावसामुळे बळीराजा अडचणीत सापडला आहे. शेतकऱ्यांनी पिकवलेल्या मका आणि कापूस पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून अवकाळीच्या बसलेल्या फटाक्यांमुळे शेतकऱ्यांसमोर पुन्हा एक नवे संकट उभे राहिले आहे.

गेल्या पाच सहा दिवसात मोठ्या प्रमाणात अवकाळी पावसाचा तडाखा बसला आहे. या पावसामुळे शेतांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचले असून पिकांचे नुकसान झाले आहे. सौंदत्ती येथील हंचीनाळ परिसरातील कापूस आणि मका उत्पादक शेतकऱ्यांना याचा मोठा फटका बसला असून संपूर्ण पीक चिखलात रुतले आहे.

सुमारे तीन हजार हेक्टर परिसरात मक्याची लागवड करण्यात आली होती. परंतु अवकाळी पावसामुळे संपूर्ण पिकाचा नाश झाला आहे. प्रति एकर २५ ते ३० हजार रुपयांचे नुकसान झाले असून हातातोंडाशी आलेले पीक पावसामुळे खराब झाले आहे.

मका, कापूस याप्रमाणे इतर पिकांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून सरकारतर्फे पीक नुकसानीचा सर्व्हे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकरी करीत आहेत. अवकाळीमुळे झालेल्या पीक नुकसानीची भरपाई देण्यासाठी सरकारने पाऊले उचलावीत अशीही मागणी शेतकरी करत आहेत.