Politics

विधान परिषदेसाठीच्या इच्छुकांची यादी केपीसीसीला सादर

Share

विधान परिषदेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसमध्ये आतापासूनच हालचाली सुरु झाल्या आहेत. इच्छुकांची संख्या मोठी असून, त्यांची यादी जिल्हा काँग्रेस समितीने प्रदेश काँग्रेस कार्यकारिणीला पाठवून दिली आहे.

पुढील वर्षी होणाऱ्या विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा काँग्रेसमध्ये आतापासूनच हालचालींना वेग आला आहे. बेळगाव जिल्ह्यातून काँग्रेसच्या ३ इच्छुकांनी पक्षाकडे अर्ज केले आहेत. जिल्हा काँग्रेस समितीकडे अर्ज केलेल्यांत बेळगाव ग्रामीणच्या आ. लक्ष्मी हेब्बाळकर यांचे बंधू चन्नराज हट्टीहोळी, किरण साधूनवर आणि सुनील हनमण्णावर यांचा समावेश आहे. चिक्कोडी विभागातूनही ३ दिग्गजांसह एकूण चौघांनी अर्ज केले आहेत.

माजी खा. प्रकाश हुक्केरी, माजी मंत्री वीरकुमार पाटील, माजी मंत्री शहाजहान डोंगरगाव आणि डॉ. एन. ए. मगदूम यांनी विधान परिषदेच्या उमेदवारीसाठी पक्षाकडे अर्ज केले आहेत. चिक्कोडी जिल्हा काँग्रेस समितीने हे अर्ज केपीसीसीकडे पाठवून दिले आहेत. आपल्यालाच उमेदवारी मिळावी यासाठी येनकेन प्रकारे इच्छुकांनी प्रयत्न सुरु केले आहेत. हायकमांडवर दबाव आणण्यासाठी लॉबिंग करण्यात येत आहे. विधान परिषद निवडणुकीची तारीख अद्याप जाहीर झालेली नाही, तोच उमेदवारीसाठी इच्छुकांनी जोरदार प्रयत्न सुरु केले आहेत. निवडणुकीची घोषणा होण्यापूर्वीच काँग्रेस आपले उमेदवार निश्चित करण्याची शक्यता आहे. मात्र निवडून येण्याची क्षमता हाच निकष यासाठी लावण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर कोणाला उमेदवारी मिळणार हे पाहण्यासाठी थोडावेळ प्रतीक्षा करावी लागणार आहे.