Banglore

सिंदगीत हरलातच ना? हा कुठला विजयाचा संकेत? मुख्यमंत्र्यांचा काँग्रेसला टोला !

Share

सिंदगीत ३१ हजार मतांच्या फरकाने हरलातच ना? हा कुठला विजयाचा संकेत? अशा शब्दांत मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी बुधवारी काँग्रेसला टोला लगावला.

‘हानगलमधील भाजपचा पराभव हा पुढील विधानसभा निवडणुकीच्या निकालाचा संकेत आहे’ या काँग्रेस नेत्यांच्या विधानावर बंगळुरात बुधवारी प्रतिक्रिया देताना मुख्यमंत्री बोम्मई म्हणाले, मागीलवेळी नान्जनगोडू आणि गुंडलुपेटे मतदारसंघात काँग्रेस जिंकली होती. मात्र वर्षभरातच झालेल्या निवडणुकीत ते पराभूत झाले. राज्यात तर पूर्णतः पराभूत झाले. सिद्दरामय्या तर मुख्यमंत्री असताना झालेल्या पोट निवडणुकीत पराभूत झाले होते. कधी पराभव होईल तर कधी विजय, पोटनिवडणूक आणि सार्वत्रिक निवडणुकीचा काही संबंध नाही. २०१४ ते २०१९ पर्यंत आम्ही हरलो, सगळे त्याला संकेत म्हणत होते. पण २०१९मध्ये सर्वाधिक जागा मिळवत जिंकून आलो. राजकारणात सर्व काही चालते असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

आम्ही जय-पराजय समान दृष्टीने पाहतो. सिंदगीतील विजयासाठी कष्ट घेतलेले आमचे नेते, कार्यकर्ते आणि मतदारांचे आभार मानतो. पराभवाबाबत आत्मवलोकन करू असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

हानगलमधील पराभवाबाबत प्रतिक्रिया देताना मुख्यमंत्री म्हणाले, सी. एम. उदासी यांचा संपूर्ण बेस वापरण्यात आम्ही काही प्रमाणात कमी पडलो. कोरोना संकटात काँग्रेस उमेदवाराने जनतेची मोठी सेवा केली. त्यामुळे लोकांनी त्यांना विजयी केले असे त्यांनी सांगितले.

एकंदर, पोटनिवडणुकीत निकाल हा सार्वत्रिक निवडणुकीचा संकेत असू शकत नाही असा पलटवार मुख्यमंत्र्यांनी काँग्रेसवर केला.