Politics

सिद्दरामय्या यांनी साधला बोम्मई, कुमारस्वामींवर निशाणा

Share

देवेगौडा १९६७मध्ये विधान परिषद सदस्य झाले, त्याच्या पाठोपाठ कुमारस्वामी जन्मले. ते कधी बकऱ्यांच्या कळपात झोपून आले आहेत? एस. आर. बोम्मई एमएलए, एमएलसी, विरोधी पक्षनेता होते. त्यामुळे बसवराज बोम्मई यांनी कधी, कुठे मेंढ्या राखल्या असा उपहास विरोधी पक्षनेते सिद्दरामय्या यांनी केला.

होय, मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्या घोंगडीविषयक विधानानंतर राज्याच्या राजकारणात सध्या बकऱ्या-मेंढ्या आणि घोंगडीचा विषय गाजत आहे. सिंदगी येथे यावरून पत्रकारांनी छेडले असता, विरोधी पक्षनेते सिद्दरामय्या यांनी कुमारस्वामी आणि मुख्यमंत्री बोम्मई यांच्यावर उपहासात्मक टीका केली. घोंगडी हे आमच्या धनगर समाजाचे प्रतीक आहे. त्याचा अनादर मी करत नाही. मी आजपर्यंत घोंगडीचा मुद्दा राजकारणात आणला नाही. मुख्यमंत्री बोम्मई यांनी तो आणला असे सिद्दरामय्या म्हणाले.

राज्यात भाजपची सुनामी लाट आहे या मुख्यमंत्री बोम्मई यांच्या विधानावर प्रतिक्रिया देताना सिद्दरामय्या म्हणाले, कसली सुनामी? सिंदगीत त्यांनी काय विकास केला हे सांगावे, सिंदगी शहरातील रस्त्यांची अवस्था काय आहे? आता सत्तेत कोण आहे? रमेश भुसनूर तब्बल १० वर्षे एमएलसी होते. त्यांनी काय केले? युती सरकारमध्ये मनगुळी यांनी अनुदान मंजूर करवून आणून विकास केला. पिण्याच्या पाण्याच्या, शेतीसाठी पाटबंधारे योजना राबविल्या. मात्र अडीच वर्षांत भुसनूर यांची कामगिरी काय आहे? भाजपने काय विकास केला हे मुख्यमंत्री बोम्मई यांनी सांगावे असे आव्हान सिद्दरामय्या यांनी दिले.