Politics

‘त्या’ आयटी धाडींमागे राजकारणाचा हेतू : माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या

Share

सध्या राज्यभर सुरु असलेल्या आयटी धाडीसंदर्भात माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी शंका उपस्थित केली असून आयटी धाड टाकण्यामागे राजकीय हेतू असल्याचा अंदाज त्यांनी व्यक्त केलाय.

म्हैसूर विमानतळावर प्रसारमाध्यमांशी सिध्दरामय्यांनी संवाद साधला. यावेळी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींना प्रतिक्रिया देताना बी. एस. येडियुरप्पा यांचे आप्तस्वकीय विजयेंद्र यांच्यावरील आयटी विभागाच्या कार्रवाईसंदर्भात संशय व्यक्त केला आहे. शिवाय यामागेही कोणतेतरी राजकारण असल्याचा अंदाज त्यांनी बोलून दाखविला.

राज्यातील आगामी पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर काँग्रेसचाच विजय होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. परंतु या पोटनिवडणुकीच्या निकालावरून भविष्यातील निवडणुकीचा अंदाज लावणे मुश्किल असल्याचे ते म्हणाले. पुढील निवडणुकीसंदर्भात काही सांगू शकत नाही. परंतु जनतेला या निवडणुकीच्या निकालाची आणि सरकारच्या भूमिकेची कल्पना असल्याचे सिद्धरामय्या म्हणाले. केंद्र आणि राज्य सरकारला जनता आता कंटाळली असून काँग्रेसचा दोन्ही जागांवर विजय होईल, असे ते म्हणाले.

जेडीएसने जाहीर केलेल्या अल्पसंख्यांक उमेदवारीच्या मुद्द्यावर बोलताना सिद्धरामय्या म्हणाले, कि जेडीएस ने चांगला हेतू ठेऊन अल्पसंख्यांक उमेदवार निवडला नाही. त्यामुळे आगामी पोटनिवडणुकीत जनता आम्हाला साथ देईल, असा विश्वास सिद्धरामय्या यांनी व्यक्त केलाय.