Dharwad

हुबळीत क्रीडांगणाचे काम अपूर्ण : क्रीडापटूंचे स्वप्न अधुरे

Share

स्मार्ट सिटी योजनेत निवड झालेल्या हुबळीधारवाड जुळ्या शहरांसाठी हुबळीत स्मार्ट क्रीडांगणाची योजना काही वर्षांपूर्वी हाती घेण्यात आली होती. सिन्थेटिक क्रीडांगण करण्याचा दावा करण्यात आला होता. मात्र आतानिधीचा अभावया कारणाखाली हे काम अर्धवट सोडल्याने अनेक प्रतिभावान क्रीडापटूंचे स्वप्न अधुरेच राहिले आहे.

हुबळी-धारवाड जुळ्या शहरात स्मार्ट सिटी योजनेतून अनेक विकासकामे हाती घेण्यात आली होती. मात्र ती मंदगतीने सुरु आहेत वा रखडली आहेत. त्यामुळे जनतेत संताप पसरला आहे. आता त्यात क्रीडांगणाच्या कामाचीही भर पडली आहे. हुबळीच्या मध्यवर्ती भागातील नेहरू मैदानाचे स्मार्ट क्रीडांगणात रूपांतर करण्यात येणार होते. मात्र निधीच्या अभावाने हे काम रखडल्याचे कारण अधिकारी देत आहेत. या ठिकाणी सिन्थेटिक ग्राउंड करणार असल्याचे सांगून कामाला प्रारंभ केला होता. मात्र आता अतिरिक्त निधीच्या अभावी हे काम अर्धवट सोडल्याने क्रीडापटूंचे स्वप्न भंगले आहे.

नेहरू मैदान स्मार्ट करून तेथे सिन्थेटिक ग्राउंड करण्यासाठीच्या कामासाठी २१.४४ कोटी रुपये निधी निश्चित करून जून २०२० मध्ये निविदा काढण्यात आल्या होत्या. वालिबॉल, फुटबॉल, बास्केटबॉल, ऍथलेटिक ट्रॅक, कॅरम, चेस, क्रिकेट, जिम अशा इनडोअर व आऊटडोअर खेळांची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार होत्या. मात्र आणखी पाच कोटी रुपयांची गरज असल्याचे सांगत हे काम बंद ठेवले आहे. अधिकारी मात्र काम लवकरच संपेल असा दावा करत आहेत.

एकीकडे हुबळी-धारवाड जुळ्या शहरात स्मार्ट सिटी योजनेची कामे मंदगतीने सुरु आहेत. त्यामुळे जनतेत नाराजी आहे. त्यातच निधीअभावी नेहरू मैदानाचे सिन्थेटिक ग्राउंड चे काम बंद पडले आहे. त्यामुळे क्रीडापटूंचा विरस झाला आहे. लवकरात लवकर हे काम पूर्ण करावे अशी जनतेची अपेक्षा आहे.